नवी दिल्ली : चीनी मंडी
सहकार क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर स्वतःचे ऑफिस सुरू करून वर्षानूवर्षे नीट चालत आलेल्या सहकार क्षेत्राला आव्हान देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. सहकार क्षेत्राला सध्या याचाच सर्वाधिक धोका आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह सुगर फॅक्टरीजच्या ५९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री सी. आर. चौधरी, उत्तर प्रदेशचे ऊसमंत्री सुरेश राणा, महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात शरद पवार यांनी साखर आणि सहकाराशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘साखरेच्या बाबत कोणत्याही परिस्थिती सरकारची भूमिका महत्त्वाची असते. उत्पादन जास्त झाले, तरी आणि कमी झाले तरी सरकारला लक्ष घालावे लागते.’ सध्याच्या अतिरिक्त साखरेच्या परिस्थितीत मोदी सरकार चांगली पावले उचलत असल्याचे सांगून पवार यांनी सरकारचे कौतुक केले.
साखरेचे दर कमी करून शेतकऱ्यांच्या दुःखात भर घालायला अनेकजण सरसावल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘सरकारने लवकरात लवकर निर्यात बाजारपेठ शोधावी तसेच सहकारी कारखान्यांनी साखरेबरोबरच वीज आणि इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत करावे.’
उसाला बिटाच्या शेतीचा पर्यायही पवार यांनी यावेळी सूचविला. हा एक उत्तर पर्याय असून, साखर निर्मितीनंतर त्याचा पल्पही वापरात येऊ शकतो, असे पवार यांनी सांगितले. उसाला लागणाऱ्या जादा पाण्याचा मुद्दा घेत शास्त्रज्ञांनी कमी पाण्यात येणाऱ्या उसाचे संशोधन करायला हवे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. निर्यात कर शून्य टक्के आणि आयत कर १०० टक्के केल्याबद्दल राणा यांनी केंद्राच्या निर्णयांची प्रशंसा केली.
साखर उद्योगात साखर निर्माते, व्यापारी आणि ऊस उत्पादक तिघे आहेत. आम्हाला या तिघांचाही विचार करून योग्य ते धोरण आखायला हवे. जगाच्या बाजारपेठेत यंदा १९०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, १०० लाख टन अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात निर्यात करणेही आव्हानात्मक आहे.
– सी. आर. चौधरी, केंद्रीय मंत्री
आधीच संकटात असलेला साखर उद्योग पुढच्या वर्षीच्या बंपर उत्पादनानंतर आणखी संकटात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यातीवर अधिक लक्ष केंद्रीत करावे.
– दिलीप वळसे-पाटील, अध्यक्ष, एनएनएफसीएसएफ