शिंदे कारखाना ११.५० टक्क्यासह उताऱ्यात सोलापूर जिल्ह्यात अव्वल : आमदार बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. एक पिंपळनेर व युनिट नं. दोन करकंब या दोन्ही कारखान्यांचा २०२३-२४ चा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. या गळीत हंगामात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नं. एक पिंपळनेर व युनिट नं. दोन करकंब कारखान्याचे ३० नोव्हेंबरअखेर ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. दोन्ही कारखान्यांनी साखर उताऱ्यात जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. दोन्ही युनिटचा ११.५० टक्के दिवसाचा, तर सरासरी साखर उतारा १०.५० टक्के असल्याची माहिती संस्थापक-अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

आमदार शिंदे म्हणाले की, पिंपळनेर येथे आजअखेर चार लाख २० हजार ११६ मे. टन व करकंब येथे आजअखेर एक लाख ३२ हजार मे. टन उसाचे गाळप झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर उसाचे गाळप पाच लाख ५२ हजार ३९६ मे. टन झालेले आहे. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडे यंदा गाळपास आलेल्या उसाचे ३० नोव्हेंबरअखेर ऊस बिल जमा करण्यात आले आहे. उसाचे बिल वेळेत जमा करण्यात शिंदे कारखाना राज्यातील एकमेव साखर कारखाना असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

आमदार बबनराव शिंदे म्हणाले, दोन्ही कारखान्याच्या ऊसतोडणी वाहतूक वाहनचालकांची १५ नोव्हेंबरअखेरपर्यंतची तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत. तोडणी वाहतूक बिलापोटी कारखान्याने १७ कोटी २२ लाख जमा केले आहेत. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आ. बबनराव शिंदे यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संतोष दिग्रजे, सुहास यादव व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here