शिवभोजन थाळीचा एक कोटीहून अधिक लोकांना आधार

मुंबई दिनांक 30: गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. दिनांक २६ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण झाले आहे. योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.

*महिनानिहाय थाळ्यांचे वितरण*
जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ०३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४० आणि जुन महिन्यात २९ जून पर्यंत २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण राज्यात झाले आहे.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले.

यंत्रणेचे कौतुक
या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतूक केले आहे.

केंद्राची स्वछता
शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here