गुंतवणूकदारांना झटका: शेअर बाजारातील घसरणीमुळे ५ लाख कोटी रुपये बुडाले

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज, गुरुवारी झालेल्या मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांना ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) निर्देशांक १००० अंकांपेक्षा अधिक घसरला. तर निफ्टी ३०० अकांच्या घसरणीसह १६००० पेक्षा खाली आला. सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आली आहे.

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान सोसावे लागले आहे. बीएसई लिस्टेड स्टॉक्सच्या मार्केट कॅपिटलमध्ये घसरणीनंतर ५ लाख कोटी रुपयांची घट झाली. बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर बीएसई लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅपिटल २४६ लाख कोटी रुपये होते. गुरुवारी विक्रीच्या दबावानंतर ते २४१ लाख कोटी रुपयांवर आले. गेल्या एक महिन्यात मार्केट कॅपिटल ३४ लाख कोटींनी कमी झाले आहे.

खरेतर जागतिक स्तरावर कमकुवत स्थितीमुळे घसरण झपाट्याने झाली. अमेरिकेतील महागाईच्या बुधवारी जारी झालेल्या आकडेवारीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड बघायला मिळाली. अमेरिकेच्या महागाई दरात किरकोळ घसरण झाली आहे. महागाईचा दर ८.५ टक्क्यांवरुन ८.३ टक्क्यांवर आला आहे. मात्र बाजाराला यापेक्षा अधिक महागाई कमी होण्याची अपेक्षा होती. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढीची भीती आहे. त्यामुळे या सर्व जागतिक संकेतांमुळे सकाळी आशियाई बाजार घसरणीसह खुले झाले. भारतीय बाजारही याला अपवाद ठरला नाही. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. गुरुवारी एक डॉलरच्या तुलनेत रुपया घटून ऐतिहासिक ७७.५९ रुपयांपर्यंत घसरला. यामुळे बाजारात अस्वस्थता आहे. रुपया घसरल्याने आयात महागणार असून त्याचा थेट परिणाम कंपन्यांकडून किमती वाढविण्यावर होईल. सरकारची वित्तीय तुट वाढण्याचाही धोका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here