चंदगड तालुक्यात उसाचे सहा ट्रॅक्टर अडविले

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गतवर्षीच्या उसाला प्रतिटन ४०० व चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातवणे (ता. चंदगड) येथे आंदोलकांनी उसाची वाहने रोखली. चंदगड तालुक्यातील हेमरस व दौलत कारखाना सुरू झाल्यामुळे ऊस तोडी सुरू आहेत. ‘दौलत’कडे ऊस वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सातवणे येथे अडवल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून कारखानदार, वाहतूकदारांना सुरक्षा पुरवली जात आहे.

सरकार कारखानदारांना पाठीशी घालत आहे. शेतकऱ्याचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न चालवत आहे, असा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेली ऊसतोड फडात जाऊन बंद पाडणार, असा निर्णय घेतला. त्यातूनही वाहने ऊस भरून रस्त्यावर आली तर आमच्यावर कितीही गुन्हे झाले तरी वाहनांच्या चाकातील हवा काढून वाहने रोखू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here