ऊस परिषदेत ठरणारा दर दिला तरच गाळपास सहमती : राजू शेट्टींचा इशारा


कोल्हापूर
 : पुढील वर्ष साखर उद्योगासाठी चांगले जाणार आहे. साखरेला जवळपास प्रति क्विंटल ३६०० पासून ते ४२०० रूपयेपर्यंत दर मिळणार आहे. यामुळे यावर्षी  साखर कारखानदारांनी जाहीर केलेली एफआरपी आम्हाला मान्य नाही. ऊस परिषदेत जो दर ठरेल, तो घेतल्याशिवाय आम्ही हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. शिरोळ येथील निवासस्थानी झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यास नकार दिला आहे. ते चालू गळीत हंगामातील एफआरपी जाहीर करून गळीत हंगाम सुरू करत आहेत. मात्र, त्यांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांना जादा दर मिळालाच पाहिजे. जे लोक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले, ते आता एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी ते शेतकऱ्यांना देशोधडीस लावणार असतील तर मी स्वस्थ बसणार नाही.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, राम शिंदे, शैलेश आडके, सचिन शिंदे, सागर शंभूशेटे, रामचंद्र फुलारे, राजगोंडा पाटील, अजित पाटील, राजाराम देसाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here