देशातील छोट्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळाला पाहिजे: केंद्रीय मंत्री तोमर

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज शेती अवजारे तंत्रज्ञान शिखर परिषदेचे उद्घाटन केले. सीआयआयअर्थात भारतीय उद्योग महासंघ आणि टीएमए अर्थात ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन संघटना यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले आहे. देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 85% छोटे शेतकरी आहेत आणि त्यांना कृषी क्षेत्रात विकसित तंत्रज्ञान आणि यंत्रे यांचा लाभ मिळाला पाहिजे, असे तोमर यांनी यावेळी सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार या दिशेने सातत्याने प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने कृषीक्षेत्रातील यांत्रिकीकरण करण्यासाठीच्या उप-अभियानाअंतर्गत प्रशिक्षण चाचणी, उच्च-तंत्रज्ञान केंद्रे आणि शेती अवजारे बँक (एफएमबी) यांची उभारणी अशा विविध उपक्रमांसाठी राज्य सरकारांना वर्ष 2014-15 ते वर्ष 2022-23 या कालावधीत 6120.85 कोटी रुपये वितरीत केले आहेत. त्याशिवाय, राज्य सरकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानित दरात ट्रॅक्टर्स, यांत्रिक मशागत यंत्रे, तसेच स्वयंचलित यंत्रसामग्रीसह 15.24 लाख शेतीची अवजारे आणि साधने यांचे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती तोमर यांनी उपस्थितांना दिली.

 

मध्य प्रदेशातील बुधनी येथे असलेल्या केंद्रीय कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण तसेच चाचणी संस्थेमध्ये (सीएफएमटीटीआय) नवी यंत्रणा लागू करून केंद्र सरकारने ट्रॅक्टर्सच्या चाचण्या पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ जास्तीतजास्त 75 कामकाजी दिवसांवर आणला आहे, असेही त्यांनी सांगितले.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here