सोलापूर : यंदाचा उसाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. सध्या सोलापूर जिल्ह्यातील ३४ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. मात्र, मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदाच्या गाळपासाठी जिल्ह्यात ८० ते ८५ टक्के ऊस खोडवाच आहे. गतवर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी नवीन उसाची लागवड केली नाही आणि आहे त्यातील बराच ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एक लाख ४० हजार हेक्टरवर ऊस आहे. त्यातील ८० टक्के क्षेत्रावरील ऊस खोडवा आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम जेमतेम ९० दिवसांपर्यंतच चालेल, अशी स्थिती असल्याची माहिती साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांनी दिली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने खोडवा ऊस जतन झाला आहे. त्यामुळे चांगली रिकव्हरी येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, केंद्र सरकारने साडेनऊ टक्के रिकव्हरी ग्राह्य मानून तीन हजार ४५० रुपयांची एफआरपी घोषित केली, पण कारखानदारांनी त्यांचा भाव जाहीर केलेला नाही. शेतकरी संघटनाही त्यावर शांत असल्याची स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतरही ऊस दराबाबत साखर कारखानदारांनी काहीही वक्तव्य केलेले नाही. विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढ्यातून समाधान आवताडे, माढ्यातून अभिजित पाटील, दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख, परंड्यातून तानाजी सावंत हे पुन्हा आमदार झाले आहेत. त्यांचे कारखाने असून त्या नूतन आमदारांकडून अद्याप ऊस दर जाहीर झालेला नाही. याशिवाय पराभूत उमेदवार संजय शिंदे, रणजित शिंदे, धर्मराज काडादी, दिग्विजय बागल, सिद्धाराम म्हेत्रे, यापैकी अनेकांनी हंगाम सुरू झाल्यानंतरही कारखान्याचा उसदर जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्याकडून चांगल्या दराची अपेक्षा आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.