सोलापूर : गुळाच्या दरात घसरण, शेतकरी धास्तावले

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतमधील लिलावामध्ये बुधवारी गुळाला ३२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. तर काही गूळ ४१०० रुपये दरानेही विकला गेला. मात्र सरासरी गुळ दर ३,००० रुपयांच्या आतच मिळत आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादन केलेल्या गुळाला चांगला दर मिळत नसल्याचे दिसून येते. सध्या मजुरी मोठया प्रमाणात वाढल्यामुळे गुऱ्हाळ चालविणे शेतकऱ्यांना परवडत नाही. न परवडणारे गुऱ्हाळ चालवावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा पावसाने दडी मारल्याने उसाची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादन घटले असून गुळाचे उत्पादनही कमी प्रमाणात होत आहे. गुऱ्हाळासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. गुळाच्या एका आधणास चार ते साडेचार हजार रुपये खर्च येतो. एका आधणामध्ये दहा किलोच्या आठ ते दहा ढेपी निघतात. सरासरी एक क्विंटल गुळाचे उत्पादन होते. या गुळाला ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत दर मिळतो. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुळाला किमान ६० ते ७० रुपये दर मिळणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here