थकवलेली ऊस बिले लवकर मिळावीत: स्वाभिमानी संघटनेची मागणी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यामधील कामगारांचे थकीत पगार त्वरित अदा करावेत व विठ्ठलराव शिंदे कारखान्यांच्या वगळलेल्या 18 सभासदांना कायम सभासदत्व मिळावे या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी , विठ्ठल सहकारी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, गोकूळ शुगर, बबनराव शिंदे शुगर, विजय शुगर, शंकर सहकारी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकवलेली आहेत.

या आंदोलनाची दखल घेत साखर आयुक्तांनी मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर आर.आर.सी. ची कार्यवाही केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे
यांनी दिली. उर्वरित मागण्या त्वरित निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रणदिवे म्हणाले, साखर आयुक्तांनी फक्त आर.आर.सी. ची कार्यवाही केल्यानंतर महसूल विभागाने त्या कार्यवाहीचा कालबद्ध पाठपुरावा करावा. पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे या सहकारी साखर कारखान्यावर तत्काळ आर.आर.सी. करावी. या कारखान्याने ऊसबिले दिल्याची खोटी माहिती दिली असून या कारखान्याने प्रशासन, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत या कारखान्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यातील सीताराम साखर कारखान्याच्या ऊसबिला संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालावर साखर आयुक्तांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी सोलापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, माजी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिन पाटील, निवास भोसले, नरेंद्र पाटील, पप्पू पाटील, रणजित बागल, राहुल बिडवे, इक्बाल मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here