सियोल : दक्षिण कोरियामधील तांदूळ उत्पादनात यावर्षी खराब हवामानामुळे निर्माण झालेल्या स्थितीने घसरण झाली आहे. यंदा, २०२२ मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन ३७,६४,००० टन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ३ टक्क्यांनी कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. खराब हवामानाचा भात पिकावर परिणाम झाल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी तांदळाचे उत्पादन १०.७ टक्क्यांनी वाढल्यानंतर दक्षिण कोरियात यंदा उत्पादन घटल्याचे दिसून येते. देशात २०१६ ते २०२० अशी सलग पाच वर्षे तांदळाचे उत्पादन घटल्याचे दिसून आले आहे. पावसामुळे आणि हिनामनोर वादळाच्या नकारात्मक परिणामांमुळे तांदूळ उत्पादनात घट दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरात तांदळाचे लागवड क्षेत्र ०.७ टक्क्यांनी घटून ७,२७,०५४ हेक्टरवर आले आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनात घसरण झाली आहे. दैनंदिन खाण्याच्या पद्धतींमध्ये झालेल्या बदलांमुळे गेल्या दशकभरात देशात तांदळाच्या खपामध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे.