वाशिममध्ये सोयाबीन पिकाला पावसाचा फटका

वाशिम : सोयाबीनचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन पिक काढणीला वेग आला असताना दसऱ्याच्या रात्री पावसाने झोडपून काढले आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे.

यंदा जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी केल्यानंतर अडीच महिने सलग पाऊस पडत होता. त्यामुळे महत्त्वाचे खरीप पीक सोयाबीन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या एक आठवड्यापासून सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. दसऱ्यापूर्वी अनेकांनी सोयाबीन पिक काढण्यास सुरुवात केली. निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीनची काढणी केली आहे. मात्र बुधवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसामुळे काढणी केलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. दसऱ्याच्या संध्याकाळी जिल्हाभरात मुसळधार पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील अनेक गावांना पावसाचा फटका बसला असून नदी-नाल्यांना पूर आला. दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सोयाबीन काढणी हंगामावर मोठा परिणाम झाला असून, सर्व कामे ठप्प झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here