श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई : साखरेचे दर गगनाला भिडले

कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. महागाईमुळे देशातील खाद्यपदार्थांच्या किमती भरमसाठ प्रमाणात वाढल्या आहेत. श्रीलंकेत एक किलो साखरेची किंमत २९० श्रीलंकन रुपयांवर पोहोचले आहेत. ४०० ग्रॅम मिल्क पावडर ७९० रुपये, तांदूळ ५०० श्रीलंकन रुपये किलोवर पोहोचले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दूध पावडरची किंमत २५० रुपयांनी वाढली आहे.

लोकांना अन्नधान्य खरेदी करण्यासाठी अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे. आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याने श्रीलंकेतील तमीळ नागरिक भारताकडे येत आहेत. १६ श्रीलंकन नागरिक मंगळवारी भारतात दाखल झाले. मोठ्या संख्येने नागरिक भारतात येत असल्याचे अनुमान आहे. श्रीलंकन शरणार्थींच्या दोन टीम मंगळवारी भारतीय किनारपट्टीवर पोहोचल्या. यापैकी सहा लोकांना भारतीय तटरक्षक दलाने रामेश्वरम येथून वाचवले. ते अरिचाल मुनईपासून दूर एका द्विपकल्पावर अडकले होते. या लोकांनी श्रीलंकेतील उत्तर जाफाना, मन्नार क्षेत्रापासून प्रवास केला होता. यामध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. दहा लोकांची दुसरी टीम भारतीय किनारपट्टीवर पोहोचली.

श्रीलंकेकडील परकीय चलनाचे भांडार संपुष्टात आल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. देशाकडे गरजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. या वर्षी त्यांना ६ अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज चुकवावे लागणार आहे. मात्र, त्यांच्याकडे दोन अब्जच्या आसपास परकीय चलन आहे. चीनने कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर भारताने १७ मार्च रोजी श्रीलंकेला १ अब्ज डॉलर क्रेडिट सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here