सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी विमानतळास अडचणीची ठरत असल्याने महापालिकेने १५ जून रोजी ती जमीनदोस्त केली. त्यानंतर कारखान्याने काही दिवसांनी त्याच जागेवर ३० मीटर चिमणी नव्याने बांधायला परवानगी मागितली. मात्र, चिमणी उभारणीला अद्याप परवानगी मिळालेली नाही. विमानतळ प्राधिकरणाने ६० मीटर चिमणी उभारणीस परवानगी दिलेली नाही. परिणामी साखर कारखान्याने जुन्या चिमणीवरून गाळप करता येईल का? याचा विचार चालवला आहे.
सकाळमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगामाच्या दृष्टीने सिद्धेश्वर साखर कारखान्याने महापालिकेकडे ३० मीटर चिमणी बांधणीची परवानगी मागितली. मात्र, अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.
विमानतळावरून नाईट लॅण्डिंग होणार नसल्याने विमानतळ विकास प्राधिकरणाकडे एनटीपीसीप्रमाणे ६० मीटर चिमणी उभारणीला परवानगी द्यावी, अशीही मागणी कारखान्याने केली. मात्र, त्यांच्याकडूनही अद्याप परवानगी मिळालेली नाही. याबाबत कारखान्याचे तज्ज्ञ मागदर्शक धर्मराज काडादी यांनी सांगितले की, नवीन चिमणी उभारणीसाठी परवानगी मागूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पूर्वीच्या जुन्या चिमणीवरून गाळप शक्य होईल का, दररोज किती मेट्रिक टन गाळप होऊ शकते, याची चाचपणी सुरू केली आहे. कारखाना बंद राहू नये.