पंजाब: साखर कारखान्याच्या गैर व्यवस्थापनाबाबत माजी मुख्यमंत्र्यांची राज्य सरकारवर टीका

चंदिगड : भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भोगपूर साखर कारखान्याच्या गैर व्यवस्थापनप्रश्नी राज्य सरकारवर टीका केली आहे. दोआबा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने कॅप्टन अमरिंदर सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्यावर्षी १७ जुलै रोजी कारखान्याच्या टर्बाईनमध्ये स्फोट झाला होता. त्यामुळे साखर कारखान्याचे विज उत्पादन थांबले होते. टर्बाईन स्फोटापूर्वी पहिल्या चार महिन्यांत कारखान्याने १४ कोटी रुपयांच्या विजेचे उत्पादन आणि विक्री केली होती. मात्र नंतर प्लांट पुन्हा सुरू न झाल्याने साखर कारखान्याला १२ कोटी रुपयांची विज खरेदी करावी लागली. त्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यात उशीर झाला.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दावा केला की, त्यांच्या सरकारने नोव्हेंबर २०२० मध्ये १०९ कोटी रुपये खर्च करून साखर कारखान्याचे आधुनिकीकरण आणि जिर्णोद्धार करण्यात आला होता. कारखान्याची क्षमता १०१६ टीसीडीपासून वाढवून ३००० टन प्रती दिन (टीसीडी) करण्यासह १५ मेगावॅटचा एक नवा विजेचा प्लांट स्थापन करण्यात आला होता.
अमरिंदर यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने बड्या शेतकऱ्यांना जादा लाभ देण्याची खेळी केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बड्या शेतकऱ्यांना आधी आपला ऊस कारखान्याकडे आणण्यासाठी मदत केली जाते. आणि त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना खासगी एजंटांकडे जाण्यास भाग पाडले जाते. अशा खासगी घटकांकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत. अमरिंदर यांनी आरोप केला की, कारखाना प्रशासनाकडे योग्य टोकन प्रणाली नाही. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आपले उत्पादन कारखान्याकडे आणण्यास अडथळे निर्माण होतात. परिणामी त्यांना नंतर कोणत्याही चुकीबद्दल मोठा दंड भरावा लागतो. गेल्या हंगामात ८७१ शेतकऱ्यांना ७० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आधीच आर्थिक तंगीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना हा भुर्दंड सोसावा लागणे गैर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here