तेहरान : अमेरिकेसोबत झालेल्या १४ कलमी सामंजस्य करारातील (MoU) सर्व अटी पूर्ण होईपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी समुद्री वाहतुकीसाठी खुली केली जाणार नाही, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. गालिबाफ यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा निर्णय परदेशी निर्बंध पूर्णपणे हटवणे आणि लष्करी कारवाया थांबवण्याशी थेट संबंधित आहे.ते म्हणाले, अमेरिकेने सामंजस्य करारात केलेल्या बांधिलकीची अंमलबजावणी होईपर्यंत सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही. यात नाकेबंदी उठवणे, गोठवलेली संपत्ती मुक्त करणे, तेलावरील निर्बंध हटवणे, सर्व आघाड्यांवरील धमक्या आणि लष्करी कारवाया थांबवणे यांचा समावेश आहे.
गालिबाफ यांनी संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना इशारा दिला. इराणवर जितकी आक्रमकता केली जाईल, त्याच्या प्रमाणात त्याहून कठोर प्रत्युत्तर देण्यास इराण तयार आहे, असे त्यांनी म्हटले.त्यांनी राजनैतिक प्रक्रियेचे समर्थन करताना सांगितले की, सामंजस्य करारामुळे लष्करी संघर्ष थांबवण्यासाठी मिळालेल्या कालावधीचा उपयोग इराणने राष्ट्रीय संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी आणि देशांतर्गत अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी केला.गालिबाफ यांनी इराणच्या शहीदांच्या बलिदानाचा उल्लेख करत देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
परदेशी शक्तींकडून इराणमधील अंतर्गत स्थैर्य बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत गालिबाफ यांनी त्याविरोधातही इशारा दिला. ते म्हणाले की, इराणची जनता आणि राजकीय नेतृत्व एकजूट आहे. देशाची राष्ट्रीय एकता, जनतेचा सहभाग आणि अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कमजोर करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना यश मिळू दिले जाणार नाही.त्यांनी इराणला एकजूट, शक्तिशाली आणि सतर्क देश असल्याचे सांगत लष्करी, राजनैतिक आणि प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या जोरावर इराण या ऐतिहासिक संकटातून विजयी होईल, असा दावा केला.















