पणजी : कोरोना महामारी रोखण्यासाठी गोवा सरकारने गुरुवार, २९ एप्रिल रोजी रात्री ७ वाजल्यापासून ३ मे रोजी सकाळपर्यंत राज्यात कडक लॉकडाउनची घोषणा केली. याबाबत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, लॉकडाउनच्या कालावधीत आवश्यक सेवा, उद्योग बंद केले जाणार नाहीत. मात्र, विविध ठिकाणी आयोजित केले जाणारे साप्ताहिक बाजार बंद केले जातील. याचबरोबर राज्यातील कसिनोही बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्य सरकार याबाबत अधिसूचना जारी करणार आहे. लोकांनी आता सावधगिरी बाळगावी. कोविड १९च्या संक्रमणाची लक्षणे आढळल्यास त्वरीत औषधोपचार सुरू केले जातील. सरकारने आपल्या कोरोना महामारीच्या उपचारासंबंधीच्या निर्देशांमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे अहवालाची वाट न बघता चाचणीवेळीच औषधे दिली जाणार आहेत असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात लसीकरण केंद्रे सुरू राहतील. लोकांनी आधी नोंदणी करावी. त्यांना लस देण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.















