महाराष्ट्रात साखर कारखान्यांची ऊस बिलातही दमदार कामगिरी

पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस बिले देण्यातही दमदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे अखेर राज्यातील साखर कारखान्यांनी २२,८८८ कोटी रुपयांच्या देय एफआरपीच्या तुलनेत २१,४५४ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत. एकूण एफआरपीच्या ९३.६३ टक्के पैसे अदा करण्यात आले आहेत. राज्यात आता १४५८ कोटी रुपये ऊस थकबाकी आहे. ही फक्त ६.३७ टक्के इतकी आहे.

चालू हंगामात गाळप करणाऱ्या १९० साखर कारखान्यांपैकी १०३ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. तर ८५ कारखान्यांनी अंशतः शेतकऱ्यांना एफआरपी दिली आहे. राज्यातील दोन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसेच दिलेले नाहीत. साखर आयुक्त कार्यालयाने पैसे देण्यास असमर्थ ठरलेल्या काही कारखान्यांना महसूल वसूली प्रमाणपत्राच्या (आरआरसी) नोटीसा बजावल्या आहेत.

ऊस नियंत्रण आदेश, १९६६ अन्वये शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केल्यानंतर १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक आहे. जर मुदतीत पैसे दिले नाहीत तर त्या रक्कमेवर १५ टक्के वार्षिक व्याज द्यावे लागते. साखर आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार राज्यातील साखर कारखान्यांनी १६ मे अखेर १०६२.११ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. एकूण १०१२.०० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. राज्यातील १९० पैकी १८६ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here