नॅचरल फार्म्सकडून बायोफोर्टिफाइड भाताची महाराष्ट्रात यशस्वी लागवड

कोल्हापूर : येथील शेतकरी उत्पादक कंपनी नॅचरल फार्म्स (एफपीसी) ने बायोफोर्टिफाइड क्षेत्रात नवीन तांदळाच्या जातीची लागवड करून यश मिळवले आहे. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्चच्या सहकार्याने ही लागवड करण्यात आली आहे. भात पीकाची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या नॅचरल फार्म्सने जस्त या धातूचे प्रमाण अधिक असलेल्या बायोफोर्टिफाइड तांदळाच्या जातीची यशस्वीपणे महाराष्ट्रात लागवड केली आहे.

नॅचरल फार्म्स कंपनीचे संचालक अभिजीत पाटील यांनी राष्ट्रीय भात संशोधन संस्थेसोबत दोन वर्षांतील व्यापक सहकार्यावर समाधान व्यक्त केले. दक्षिण भारतातील राज्यांसाठी तयार केलेल्या बायोफोर्टिफाईड तांदळाची ही जात पश्चिम महाराष्ट्रात विशेषत कोल्हापूर विभागातील चंदगड, कागल आणि राधानगरी या तालुक्यांमध्ये याची लागवड केली गेली होती. या भात पिकाच्या नवीन वाणामुळे भात पीक उत्पादनात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.

संचालक अभिजित पाटील म्हणाले की, राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने या बायोफोर्टिफाइड तांदळाच्या जातीची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन केले. नवीन भाताच्या लागवडीमुळे पारंपारिक शेती पद्धतीत क्रांती घडेल असा विश्वास आम्हाला वाटतो. यातून भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. बायोफोर्टिफाइड भात प्रगत प्रजनन तंत्राने विकसित केला आहे. पॉलिश केलेल्या तांदळात २२ पीपीएम आणि पॉलिश न केलेल्या तांदळात २७ पीपीएम जस्त या धातूचे प्रमाण आढळून येते. हे भाताचे वाण १३५ ते १४० दिवसांत परीपक्व होते. विस्तीर्ण पाने, मजबुत देठामुळे भाताच्या उत्पादकता वाढीस याची मदत होते. पारंपरिक रोगांवर मात करण्याची याची जनुकीय सक्षम क्षमता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here