बदलत्या हवामान परिस्थितीत विक्रमी आडसाली ऊस उत्पादनासाठी साखर आयुक्तांकडून मार्गदर्शिका जारी

पुणे : सध्याच्या बदलत्या हवामान परीस्थितीमध्ये अभ्यासपूर्ण नियोजनाच्या आभावामुळे दिवसेंदिवस ऊस पिकाखालील जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे एका बाजूला ऊस उत्पादन व साखर उतारा कमी होत आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चामध्ये वाढ होत असल्याचे चित्र राज्यामध्ये दिसते. गारपीट, पूर परिस्थिती, अतिवृष्टी व दुष्काळ सदृश्य परीस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींचाही उसावर अनिष्ट परीणाम होत आहे. म्हणून राज्याच्या साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांसाठी आडसाली ऊस उत्पादनासाठी मार्गदर्शिका जारी केली आहे. जागतिक स्तरावरील हवामान बदल आंतर-शासकीय परीषदेने (IPCC) केलेल्या सूचनांनुसार व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, पुणे येथील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने ही मार्गदर्शिका (Advisory for sugarcane farmers) तयार केली आहे. “बदलत्या हवामान परीस्थितीत विक्रमी व शाश्वत आडसाली ऊस उत्पादन मार्गदर्शीकेचा” अवलंब करुन कमी उत्पादन खर्चात आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऊस उत्पादकांना केले आहे.

कृषी महाविद्यालय पुणेने जारी केलेल्या आडसाली ऊसाच्या विक्रमी उत्पादनासाठी नियोजन मार्गदर्शीकेत म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी माती तपासणी करून सबसॉयलरने खोलवर जमीन फोडावी. पलटीच्या सहाय्याने उभी व आडवी खोल नांगरट करावी. उपलब्ध शेणखताबरोबर एकरी चार टन मळीकंपोष्टची मात्रा द्यावी. पाच फुट अंतरावर सलग सरी पाडावी. ऊस लागणीसाठी जोडी लागणी ऐवजी जातीवंत बेणे वापरुन ऊस रोपवाटीकेत तयार केलेली रोपे वापरावीत. लगेचच पाणी देवून दोन फूट अंतरावर शिफारशीत (को-८६०३२, को. एम. ०२६५ व को.व्ही.एस.आय. ८००५ इ.) ऊस वाणांच्या एकरी ४४५० रोपांची लागण करावी. रोप लागवडीनंतर वापशावर मृद आरोग्य पत्रिकेमध्ये दर्शविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे रासायनिक खतांचे नियोजन करावे. खते अंतरावर ट्रॅक्टरचलीत यंत्राच्या सहाय्याने अथवा पेरुन द्यावीत अथवा पहारीच्या सहाय्यने मातीआड करावीत, ठिबक सिंचनाची सोय असल्यास मृद आरोग्य पत्रीकातील शिफारशीप्रमाणे विद्राव्य खते दर आठवड्यातुन एकदा याप्रमाणे ४४ हप्त्यामधे ठिबक सिंचन संचातूत द्यावीत. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा जेणेकरून ऊस पिकास खते देण्याचे काम सुलभ होते. पाण्यामध्ये बचत होवून ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते. लोकरी मावा, पोक्काबोईंग, तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठीही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. आडसाली ऊसाची तोडणी १६ ते १८ महिन्यापर्यंत करावी, असेही मार्गदर्शीकेतून सुचविण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here