साखर उद्योगाकडून सौरऊर्जा निर्मिती व्हावी यासाठी साखर आयुक्तालयाचे प्रयत्न सुरू

पुणे : राज्याच्या साखर उद्योगाकडून सौरऊर्जा निर्मिती व्हावी यासाठी साखर आयुक्तालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व साखर उपपदार्थ विभागाचे सहसंचालक अविनाश देशमुख यांच्याकडून सौरऊर्जा निर्मितीत साखर उद्योगाला असलेला वाव या विषयाची माहिती घेतली जात आहे. सौरऊर्जा निर्मितीबाबत साखर आयुक्तालय, साखर उद्योग, महावितरण अशी संयुक्त चर्चा होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत धाराशिवमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने सौरऊर्जा निर्मितीत यशस्वी पाऊल टाकलेले आहे.

साखर कारखान्यांना सध्या खर्चिक बगॅस जाळून सहवीज निर्मिती करावी लागते. नव्या प्रकल्पांना ही वीज प्रती युनिट केवळ ४.७५ रुपये ते ४.९९ रुपये मिळवून देते. त्या तुलनेत सौर वीज २.७० रुपये मिळवून देईल. परंतु त्यास कच्चा माल लागणार नाही. एक मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्यासाठी साडेतीन ते चार एकर जमीन व चार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. शासनाचे पाठबळ मिळाल्यास ते शक्य आहे. कारखान्यांना बिगर हंगामातील वीज स्वतः तयार करून सहवीज विकता येईल. त्यामुळे कारखान्यांचे तोटे कमी होऊ शकतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सांगितले की, धाराशिवमध्ये डॉ. आंबेडकर साखर कारखान्याने पाच मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प दहा एकर क्षेत्रात उभा केला आहे. परंतु सर्व कारखान्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जागा व गुंतवणुकीसाठी निधी नाही. त्यामुळे शासनाने पाठबळ देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here