साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे साखर आयुक्तांचे निर्देश

पुणे: राज्यातील सध्याची कोविडची परिस्थिती गंभीर असून कोविड रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प सुरू करावे असे निर्देश पुणे विभागाचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. त्यासाठी सध्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पात आवश्यक ते बदल करावेत अथवा बाजारातून पोर्टेबल युनीट खरेदी करावे अशी सूचना त्यांनी केली आहे.

याबाबत राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांना साखर आयुक्तांनी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या स्थितीमुळे ऑक्सिजनचा पुरवठा अत्यावश्यक बनला आहे. सध्या राज्य व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तथापि, राज्यात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा व वेळेत झाल्यास रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत होईल. राज्यासमोर व देशासमोर उभ्या राहिलेल्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प उभे राहणे आवश्यक आहे.

यासाठी राज्यामध्ये सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या जाळ्याचा वापर करावा. यापूर्वी राज्यातील साखर कारखान्यांनी नैसर्गिक आपत्तीवेळी तसेच गरजेनुसार सामाजिक योगदान दिले आहे. पुष्कळ साखर कारखान्यांकडे सहवीज निर्मिती व आसवनी प्रकल्प आहेत. अशा कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करता येईल. साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारावेत. कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात गरजेनुसार संबंधितांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल. तसेच कारखान्यांना त्यांची स्वत:ची वर्षभराची ऑक्सिजनची गरजही भागवता येईल. यासाठी यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने २१ एप्रिल रोजी आवाहन केले आहे. ज्या कारखान्याकडे इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहेत, त्यांनी त्यामध्ये आवश्यक ते बदल करून ऑक्सिजन निर्मिती करावी. किंवा बाजारात उपलब्ध असलेले पोर्टेबल युनिट खरेदी करावे. याच्या अधिक माहितीसाठी कारखान्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटशी संपर्क साधावा अशा सूचना साखर आयुक्त गायकवाड यांनी दिल्या आहेत. याबाबत राज्य साखर संघासह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रक पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here