लखनौ : तीन वर्षानंतर सुरू झालेल्या शुगर कॉन २०२२ मध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि युवा पिढीमध्ये ऊसाच्या नव्या प्रजातीबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. ऊस हे पिक म्हणजे आर्थिक विकास अशी ओळख जगभरात आहे. भारताला आत्मनिर्भर बनविण्यात ऊस पिकाचे खूप महत्त्व आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. जागतिक अन्न दिवसानिमित्त भारतीय ऊस संशोधन संस्थेच्यावतीने ‘साखर आणि एकीकृत उद्योगांची स्थिरता, प्रश्न आणि उपाय’ या विषयावरील सातव्या आंतराराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे उप महासंचालक डॉ. तिलक राज शर्मा यांनी संशोधकांना पाणी, हवामान, किड रोगांपासून बचाव करणाऱ्या गुणवत्तापूर्ण प्रजाती विकसीत करणे, गुणवत्तापूर्ण साखर, गूळ, मोलॅसिस, इथेनॉल व इतर मूल्यवर्धीत उत्पादनांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहाय्यक महासंचालक डॉ. आर. के. सिंह यांनी सांगितले की, जगातील फक्त दहा प्रजातींचे उत्पादन ५० टक्के क्षेत्रात घेतले जाते. इतर प्रजातींचा विकास आणि त्यांची शेती करण्याच्या मुद्यावर त्यांनी भर देण्याचे आवाहन केले. कानपूरच्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. नरेंद्र मोहन यांनी साखर उद्योगातील परिवर्तनावर भर दिला. गोरखपूरच्या दिनदयाळ उपाध्याय केंद्राचे कुलगुरू डॉ. राजेश सिंह यांनी विद्यार्थ्यांना नव्या शोधाची ओळख करून द्यावी असे आवाहन केले. आयआयएसआरचे संचालक डॉ. अश्विनी दत्त पाठक, माजी कुलगुरू डॉ. सुशील सोलोमन आदींनी विविध विषयांची मांडणी केली. डॉ. जी. पी. राव यांनी ऊस पिक हे ऊर्जा निर्मिती करणारे पिक बनावे. तसेच बिट, मक्का, भात, ज्वारी आदींपासूनही इथेनॉल उत्पादनावर भर देण्याचे आवाहन केले. देशात २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या सरकारच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ऊस उद्योगावर मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.