साखरेवरील निर्यात बंदीने साखर कारखाने अडचणीत: डॉ. कुलकर्णी

सोलापुर : साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी आणि दरही तेजीत आहेत. देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता असतानाही साखर निर्यातीवर निर्बंध कशासाठी ? केंद्र सरकार ने साखरेवरील निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी केली.

केंद्र सरकारने देशातील साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत निर्यातीवर बंदी घातली आहे. भारत हा जगातील दोन क्रमांकाचा साखर निर्यातदार आहे. भारतातून बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, दुबईसह विविध देशात साखर निर्यात पाठविली जाते. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, साखर निर्यातीमुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली होती. त्यातून शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देणे शक्य झाले होते.

आता साखर निर्यातबंदीमुळे कारखान्यांची आर्थीक कोंडी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षीच्या साखर निर्यातीचे आंतरराष्ट्रीय करार न झाल्यास साखर कारखान्यांवर गंभीर परिणाम होण्याची भिती कुलकर्णी यांनी व्यक्त केली.देशांतर्गत बाजारात साखरेचा दर ३१०० रुपये प्रती क्विंटल आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखर साडेचार हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. साखर निर्यातीला परवानगी मिळाली तर कारखान्यांना प्रती क्विंटल हजार ते १२०० रुपये फायदा होऊ शकतो, असा दावाही कुलकर्णी यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here