कोरोना रुग्णांसाठी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सूचना

176

पुणे: सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना पेशंटना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे. त्यामुळे आताही साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारावेत आणि त्यांचा पुरवठा कोविड सेंटरला करावा अशी सूचना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने केली आहे.

याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सद्या कोरोना विषाणूचा फैलाव गतीने झाला आहे. अशा स्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनची गरज खूप वाढली आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, शरद पवार यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे, तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवनी प्रकल्प कार्यरत आहेत, अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी. ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे, अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.

महासंचालक देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व वीजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणी सुरू करावी. त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळाचा उपयोग करता येणार आहे. या प्रकल्पांचा खर्च सुद्धा कमी होईल.

कोविडच्या स्थितीशी मुकाबला करण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन प्रयत्नशील असून ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवनी प्रकल्पांमध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बनडाय ऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अ‍ॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरीत कार्यवाही करावी, असे आवाहन महासंचालक देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here