साखर कारखान्याने ४०० कोटींची ऊस बिले थकवली, तिघांविरोधात FIR दाखल

बागपत : बागपतमध्ये मलकपूर मोदी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मलकपूर मोदी एसबीईसी साखर कारखान्याचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्त अधिकाऱ्यांविरोधात एफआरआर दाखल केला आहे. साखर कारखान्याच्या मालकाचा मुलगा आणि इतर दोघांचा यात समावेश आहे. बडौत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता पोलीस संशयितांच्या अटकेसाठी साखर कारखाना व इतर ठिकाणी शोध घेत आहेत.

ईटीव्ही भारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच इशारा दिला होता. त्यानंतरही बिले देण्यात आली नसल्याबद्दल कारखान्याचे पूर्णवेळ संचालक, अध्यक्ष आणि मुख्य वित्त अधिकाऱ्यांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसबीईसी साखर कारखाना दरवर्षी ऊस बिले देण्यास टाळाटाळ करतो असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २०२२-२३ मध्ये ४४२ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. मलकपूर सहकारी ऊस विकास समिती लिमिटेडचे प्रभारी सचिव सुधीर सिंह यांनी तक्रार नोंदवली आहे. २०२२-२३ मध्ये कारखान्याने १३३.५७ लाख क्विंटल उसाची खरेदी केली. त्यासाठी ४६२ कोटी रुपये ऊस बिल देणे अपेक्षित होते. मात्र कारखान्याने फक्त २० कोटी रुपये दिले आहेत. उर्वरीत ४४२ कोटी रुपये थकीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here