साखर कारखाना कार्यकारी संचालकांचा उपोषणाचा इशारा: पोलिस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर  झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्यावतीने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि साखर सहसंचालक यांना निवेदन देण्यात आले. संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा सर्व कार्यकारी संचालकांना काम बंद आंदोलन करून कार्यालयासमोर न्याय मागणीसाठी उपोषण करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ‘कुंभी’चे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांच्यासह जितेंद्र चव्हाण, मनोहर जोशी, संजय पाटील, एन. वाय. पाटील, के. एम. चौगले आदी उपस्थित होते.

दरम्यान, बुधवारी पुणे येथे महाराष्ट्र स्टेट शुगर फैक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर असोशिएशनने घटनेचा निषेध केला आहे. संबंधितांचा कडक कारवाई करावी, अन्यथा राज्यातील सर्व कार्यकारी संचालक काम बंद आंदोलन करतील, असा इशारा साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा : ‘राजाराम’च्या संचालक, कर्मचाऱ्यांचे निवेदन

आमदार सतेज पाटील यांच्या गुंडांच्या दहशतीमुळे राजाराम कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रश्नी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राजाराम कारखाना संचालक व कर्मचारी यांच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे कि, आ. सतेज पाटील गटाकडून आतापर्यंत राजाराम कारखान्यावर दगडफेक आणि हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कसबा बावड्यातूनच कारखान्याकडे जावे जाताना गुंडांकडून कर्मचारी आणि संचालकांच्या जीवाला धोका पोहोचवण्याची शक्यता आहे.  यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नारायण चव्हाण, सत्यजित कदम, संचालक डॉ. मारुती किडगावकर, शिवाजी पाटील, दिलीप उलपे, विलास जाधव, संजय मगदूम, सर्जेराव पाटील, नंदकुमार भोपळे उपस्थित होते.

दरम्यान, कर्मचारी संघटनेने बुधवारी सकाळी सुमारे १५ मिनिटे काम बंद ठेवून, काळ्या फिती लावून मारहाण करणाऱ्या गुंडागिरीविरोधात निदर्शन करत घटनेचा निषेध केला. संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कारखाना कर्मचारी संघटनेने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here