साखर उद्योगाला एमएसपी वाढीची प्रतीक्षा

200

केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना दिलासा देत आगामी २०२१-२२ या हंगामातील ऊसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) २८५ रुपयांवरून वाढवून २९० रुपये प्रती क्विंटल करण्याची घोषणा २५ ऑगस्ट २०२१ रोजी केली. या निर्णयाचा लाभ ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेल्यांसह साखर कारखाने, संलग्न पाच लाख कामगारांना होणार आहे.

एफआरपीमधील वाढीनंतर आता साखर उद्योगाने एमएसपीमध्ये ३१०० रुपये प्रती क्विंटलवरून वाढवून ३४५०-३५०० रुपये प्रती क्विटंल करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून साखरेचे दर कमीच आहेत असे कारखानदारांचे म्हणणे आहे. एमएसपीमध्ये २०१९ पासून बदल करण्यात आलेला नाही. सध्या साखरेचे वाढलेले दर हे सणांमुळे वाढलेली मागणी आणि राज्यात लॉकडाऊनमध्ये सवलत दिली गेल्याने अल्पकालिक आहेत असा दावा कारखानदारांचा आहे. सध्या साखरेचे दर दक्षिण विभागात ३१०० ते ३४०० रुपये क्विंटल आणि उत्तर विभागात ३५०० ते ३६०० रुपये क्विंटल असे आहेत.

याबाबत चीनीमंडी न्यूजशी बोलताना साखर उद्योगाशी संबंधीत घटकांनी एमएसपीमध्ये वाढ करण्याच्या मागणीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, एफआरपीमध्ये वाढ होईल हे निश्चित होते. आणि त्या अपेक्षेनुसारच वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत एस ग्रेड साखरेसाठी ३२-३४ रुपये प्रती किलो (एक्स मील) आणि एम. तसेच एसपीएल ग्रेडसाठी १-१.५ रुपये प्रिमियमच्या ब्रॅकेटमध्ये दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. साखरेच्या दरात आलेल्या सध्याच्या तेजीमध्ये घट झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. त्यासाठी प्रतीक्षा केली जात असल्याचे दिसते.

साखर उद्योगातील एका तज्ज्ञांनी आपले नाव न उघड करण्याच्या अटीवर एमएसपीमध्ये वाढीच्या गरजे बाबत सांगितले की, अनेक साखर कारखाने निगेटिव्ह एनडीआरमुळे नव्या हंगामासाठी खेळत्या भांडवलासाठीचे कर्ज मिळण्यास असमर्थ ठरले आहेत. जर एमएसपीमध्ये वाढ केली गेली तर कारखानदार चांगले पैसे उभे करू शकतात आणि आपला व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने वाढवू शकतात. साखर कारखाने आपल्या पतधोरणाच्या आधारावर आणि एनडीआर या प्रकारांतर्गत उपलब्ध माल गहाण ठेवून बँकांकडून खेळते भांडवल उभारतात.

महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपीमध्ये केलेली वाढ हे शेतकऱ्यांसाठी चांगले पाऊल आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर आणखी थोडे वाढतील अशी अपेक्षा असल्याचे सांगितले.

जयवंत शुगर्स लिमिटेडचे प्रमोटर डॉ. अतुल भोसले म्हणाले, शेतकऱ्यांसाठी एफआरपीमध्ये वाढ होणे ही आशादायी बाब आहे. त्यामुळे ऊसाच्या लावण क्षेत्रात वाढ झाली आहे. या घडामोडी साखर कारखानदारांसाठीही लाभदायक ठरणार आहेत. खरेतर साखरेचे दर आणि एफआरपी यांची सांगड घातली गेली तर ते उद्योगाच्या भल्याचे ठरेल.

कर्नाटकमधील प्रभूलिंगेश्वर शुगर्सचे संचालक वीरपक्षय्या गुंडगुंती यांनी सांगितले की, एफआरपीमध्ये केंद्र सरकारने केलेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी एक चांगले पाऊल ठरले आहे. आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या भलाईचा विचार करतो. साखर उद्योगाच्या स्थिरतेसाठी एमएसपीमध्येही अशीच वाढ करण्याची गरज आहे.

साखर हंगाम २०२१-२२ साठी एफआरपीमध्ये ५ रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात एफआरपीमध्ये १५ रुपये प्रती क्विंटल वाढ झाली असली तरी एमएसपी जैसे थे आहे. साखरेच्या विक्रीतून कारखान्यांना महसुलात वाढ आणि शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देण्याच्या आपल्या कार्यक्षमतेत सुधारणेसाठी एमएसपीमध्ये वाढ करणे अत्यावश्यक बनले आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here