साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा : पियूष गोयल

नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२०- सप्टेंबर २०२१ या हंगामात झालेली उच्चांकी साखर निर्यात पाहता आणि सद्यस्थितीत जागतिक बाजारपेठेतील मागणीचा फायदा उचलताना साखर उत्पादनात आणखी वाढ करावी असे आवाहन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे. साखर उद्योगाला प्रोत्साहन देताना कारखानदार आणि निर्यातदारांनी नव्या बाजारपेठांचा शोध घ्यावा. या उद्योगातील सर्व संलग्न घटकांना त्याचा फायदा मिळायला हवा, असे मंत्री गोयल म्हणाले.

कानपूर येथील नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या दीक्षांत समारंभात बोलताना मंत्री गोयल यांनी आपण सर्वांनी साखर उद्योगाच्या विस्तारासाठी एकत्र काम केले पाहिजे. या उद्योगातील उत्पादन आणखी वाढले पाहिजे. सुधारणा करून जागतिक मागणी पूर्ण करणे शक्य आहे, असे ते म्हणाले.

मंत्री गोयल यांनी सांगितले की, सरकार पुढील तीन वर्षात सध्याच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या सध्याच्या ८.५-९ टक्क्यांच्या स्तरावरुन २० टक्क्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्दीष्टाबाबत आश्वस्त आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार या दोन्ही घटकांना मदत मिळेल. गेल्या हंगामाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये साखरेचे उत्पाजन १४ टक्क्यांनी वाढून ३१ मिलियन टनावर पोहचले. तर निर्यात १९ टक्क्यांनी वाढून ७.१ मिलियन टन झाल्याचे गोयल म्हणाले. साखर उद्योगातील जाणकारांच्या मतानुसार कारखानदारांनी वेळेवर पैसे दिले नसले तरी शेतकरी ऊस पिकासोबतच राहिले. त्यांना माहीत आहे की, इतर पिकांच्या तुलनेत हे लाभदायक पीक आहे.

साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे मंत्री गोयल म्हणाले. उत्तर प्रदेशात साखरेचा उद्योग खूप मोठा आहे. मला अपेक्षा आहे की, या संस्थेचे विद्यार्थी भविष्यात साखर उद्योगात मोठे योगदान देतील अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here