साखर कारखान्याच्या मालमत्तांचा होणार लिलाव

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : चीनी मंडी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे थकवल्याचा निष्काळजीपणा न्यू फलटण शुगर वर्क्स कारखान्याला महागत पडणार आहे. एक वर्षाहून अधिक काळ कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील या साखर कारखान्यावर कारवाई होणार असून, कारखान्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.

थकीत ऊस बिल प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातून कारखान्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. रेव्हेन्यू रिकव्हरी अॅक्टनुसार (आरआरए) ही कारवाई होणार आहे. यात कारखान्याच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून येणाऱ्या पैशांतून ऊस उत्पादकांची थकीत देणी भागवण्याचे नियोजन आहे. येत्या ३० मार्च रोजी ही लिलावाची प्रक्रिया होणार आहे.

या संदर्भात उप विभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले की, साखर कारखान्याने गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. या संदर्भात साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याची एकूण थकबाकी ४ हजार कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याबाहेर आंदोलनही केले होते.

ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपी थकवली आहे. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते. कायद्यानुसार साखर कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत कारखान्याने ऊस उत्पादकाच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक आहे. पण, न्यू फलटण साखर कारखान्याने २०१७-१८च्या हंगामापासून साखर कारखान्यांचे पैसे दिलेले नाहीत. थकीत एफआरपीमुळे डिसेंबरमध्ये एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी फलटण पोलिस ठाण्याने कारखान्याच्या संचालकांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

महसूल अधिकाऱ्यांनी कारखान्याची देणी भागवण्यासाठी मालमत्तांचे मुल्यांकन केले आहे. त्यात कारखान्याच्या मालकीची एक जागाही जप्त करण्यात आली. परंतु, कारखान्याची देणी भागवण्यासाठी ती जमीन पुरेशी नसल्याचे सांगण्यात आले. म्हणूनच कारखान्याच्या इतर जंगम आणि स्थावर मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here