महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी उसाचे मुदतपूर्व गाळप सुरू करू नये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंजुरी दिली. यंदा एकूण लागवड क्षेत्रापैकी १४.०७ लाख हेक्टर क्षेत्रातील उस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. एकूण ८८.५८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रात ६ टक्क्यांनी घट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुदतीपूर्वी साखर कारखाने सुरू करू नयेत, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

गुरुवारी ऊस तोडणी हंगामाबाबत मंत्री समितीची बैठक झाली. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, आमदार प्रकाश आवाडे, डॉ. मुख्य सचिव मनोज सौनिक, साखर आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

गतवर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला होता आणि १०५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. मात्र, यंदा उसाचे क्षेत्र घटल्याने ८८.५८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. या बैठकीत ऊस तोडणी कामगार, त्यांचे कुटुंब व मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजनांच्या लाभासाठी साखर कारखानदारांकडून प्रती टन १० रुपये वसूल करून ही रक्कम लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतिगृहे तसेच कामगार कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here