विद्याधर अनास्कर म्हणाले की, साखर कारखान्यांनी आर्थिक नियोजन योग्य करायला हवे. साखर उद्योग हा असा व्यवसाय आहे की, ज्यामध्ये गुंतवलेल्या पैशांतून कमी मार्जिन दिसते. त्यामुळे आपल्या कारखान्याला कमी दराने आणि प्रत्येक गरजेला कर्ज पुरवेल अशी चांगली बँक निवडा. सर्व अडचणीत त्या वित्तीय संस्थेकडून मदत मिळाली पाहिजे. बँकेकडून लागू केले जाणारे व्याज, इतर खर्च तपासा सध्या अनेक बँका रेटिंगनुसार व्याजदर आकारतात. कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार कर्ज दिले जाते. हे लक्षात घेऊन व्यवहारात शिस्त आणा. साखर कारखान्यांनी रोखीचे व्यवहार पूर्णपणे बंद केले पाहिजेत. अगदी शेतकऱ्यांनाही चेकद्वारे पैसे द्या.
विद्याधर अनास्कर म्हणाले की, साखर कारखान्यांनी गरजेनुसार कर्ज हे तत्त्व स्वीकारले पाहिजे. कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज ही पद्धती बंद करावी. सिक्युरिटी ओरिएंटेड कर्जापेक्षा कारणपरत्वे कर्जालाच प्राधान्य द्या. बँकांना उत्पन्नातून कर्जाची परतफेड अपेक्षित असते. कारखान्याची मालमत्ता विकून नव्हे. कारखान्यांनी योग्य आर्थिक सल्लागाराची निवड केली पाहिजे. त्यासाठी मानसिकता बदलाची गरज आहे. सल्लागाराकडून चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना तो प्रोजेक्ट कारखान्यासाठी योग्य आहे की अयोग्य याचा विचार करा. याशिवाय बँकांकडून ज्या कारणासाठी कर्ज घेणार आहे, त्याच कारणांसाठी त्याचा वापर करा. आपल्या परतफेड क्षमतेनुसार कर्जाचे वर्गीकरण करा. याशिवाय कर्जाचे डायव्हर्फिकेशन करण्याची गरज आहे. कारखान्यांनी आपल्या उत्पन्नातील गळती शोधली पाहिजे. तोटा कोणत्या ठिकाणी होतो हे लक्षात घेवून त्यावर उयाययोजना करा. कर्मचाऱ्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळा. कारखान्यांनी बँकांकडे योग्यवेळी कर्जाची मागणी केली पाहिजे आणि बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला पाहिजे असा सल्ला अनास्कर यांनी यावेळी दिला.