एफआरपी जमा होण्याचा वेग वाढला; ३ हजार कोटींची बिले जमा  

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

पुणे : चीनी मंडी

महाराष्ट्रात एफआरपी थकविलेल्या साखर कारखान्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखांन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत एफआरपीची बिले शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होण्याला वेग आला आहे. ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांचे ३ हजार २९७.४८ कोटी रुपये भागवण्यात आले आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ५ हजार ३०० कोटी रुपयांवर गेलेली एकूण थकबाकी आता ४ हजार ८४१.१५ कोटी रुपयांवर आली आहे.

दरम्यान, साखर कारखान्यांवरील कारवाईमुळे ४ फेब्रुवारी रोजी सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे शिष्टमंडळ साखर आयुक्तांची भेट घेणार आहेत. आयुक्तालयाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात उत्तर प्रदेशबरोबर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर ऊस बिलांची थकबाकी होती. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यापासूनच ही परिस्थिती होती. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १५ जानेवारी अखेर राज्यात एकूण १० हजार ४८७.४३ कोटी रुपये देय होते. त्यातील ५ हजार १६६.९८ कोटी रुपये कारखान्यांकडून भागवण्यात आले होते. तर, ५ हजार ३२०.३५ कोटी रुपयांची थकबाकी होती.

साखरेची किमान विक्री किंमत एफआरपी देण्यासाठी पुरेशी नाही, असे मत साखर कारखान्यांकडून व्यक्त करण्यात आले होते. विशेषतः चांगला उतारा मिळणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर विभागात एफआरपीचा आकडा २ हजार ८५० प्रति टन जातो. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी एफआरपी देण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट केले होते.

या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या संचालकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटिवर प्रतिक्रिया दिली. सध्या आमच्या कारखान्यांकडे उपलब्ध असलेल्या निधीनुसार ८० टक्के एफआरपी (२३०० रुपये) जमा करण्याचे ठरले आहे. उर्वरीत रक्कम आम्ही हंगामा संपण्याच्या काळात देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. या तोडग्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ ऊस वाहतूक रोखली होती. एफआरपीसाठी आक्रमक झालेल्या संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखील पुण्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात आल्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पहिल्या टप्प्यात ३९ साखर कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच ५९ साखर कारखान्यांना नोटिस पाठवली. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी कारवाईच्या धास्तीने एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यास सुरुवात केली. त्यातून गेल्या काही दिवसांत ३ हजार २९७.४८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले आहेत.

 

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here