साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा: शेतकर्‍यांची मागणी

282

उस्मानाबाद: ऊस गाळप हंगाम आता तोंडावर आला आहे. जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यांचे धुराडे आता पेटले आहे. यंदा कारखान्यांचा भर इथेनॉल निर्मितीवर आहे. पण तरी अजूनही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही. जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र बर्‍यापैकी मोठे आहे. शिवाय गाळप हंगामही जवळच आहे. यंदा कारखाने अनेक दिवस चालणार आहेत. त्यामुळे कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस दर जाहिर करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने ऊस कमी होता. त्यामुळे साखर कारखाने सुरु झाले नव्हते. त्याचा आर्थिक फटका साखर उद्योगाला सहन करावा लागला. यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला असल्याने अनेक साखर कारखाने सुरु होत आहेत. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात येवून ऊस घेवून जाण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

जिल्ह्यातील ऊस आता बाहेर जाणार यामुळे यावर्षी पुन्हा एकदा ऊसाच्या दरात चढाओढ होवू शकते. साखर कारखाने जरी बंद असले तरी बाहेरच्या जिल्ह्यात नवीन कारखाने सुरु झाल्याने ऊस कुठे गाळप करायचा, या विचारात शेतकरी आहेत. अर्थात कारखाने सुरु झाले असले तरी एकाही कारखान्याने अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजाने बाहेरच्या कारखान्यांशी संपर्क करावा लागत आहे. यामुळे कदाचित बाहेरच्या जिल्ह्यात ऊस गाळप अधिक होवू शकते, असे चिन्ह दिसत आहे.

ऊस शेतकर्‍यांनी सांगितले की, ऊसतोडणी मजुरालाही त्याचे पैसे तोडणीपूर्वीच मिळतात. त्याचप्रमाणे ऊस वाहतुकीचेही असेच चक्र आहे. पण ऊस पिकवणारा शेतकरी मात्र कायमच दुर्लक्षित राहतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here