शामली : ऊसावरील टॉप बोरर व इतर किडरोग आदींच्या प्रतिबंधासाठी आयोजित कार्यशाळेत कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सहारनपूरचे विभागीय ऊस उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्रा यांनीही सर्व साखर कारखान्यांशी ऊस रोग नियंत्रण कृती आराखड्यावर चर्चा केली. कार्यशाळेत शामलीचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. विजय बहादुर सिंग, मुझफ्फरनगरचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, ऊस संशोधन संस्था मुझफ्फरनगरचे सहसंचालक डॉ. वीरेश कुमार यांच्यासह राज्यातील १७ साखर कारखान्यांचे ऊस महाव्यवस्थापक उपस्थित होते. या कार्यशाळेत शामली, मुजफ्फरनगर, सहारनपूर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जलालपूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन सहारनपूरचे विभागीय ऊस उपायुक्त डॉ. मिश्रा यांच्या हस्ते झाले. ऊस पिकातील टॉप बोरर व इतर किडरोगांच्या प्रतिबंधासाठी कृषी तज्ज्ञ, साखर कारखान्यांचे व्यवस्थापक आणि जिल्हा ऊस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी पाहणी करावी, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विशेषत: विभागातील साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना ऊसावरील रोग प्रतिबंधासाठी काम करून शेतकऱ्यांना जागृत करण्याबाबत सूचना केली. जलालपूरच्या शामली कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. विकास मलिक म्हणाले की, गेल्या वर्षी ऊसावर थोड्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला होता. यावेळी ऊसामध्ये टॉप बोरर व इतर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्व साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना या रोगांपासून जागरुक करता येईल याचे सादरीकरण त्यांनी केले.