साखर कारखान्यांनी नव तंत्रज्ञान वापरुन खर्च कपातीवर भर द्यावा : राजेश टोपे

पुणे : साखर कारखान्यांकडून उत्पादन खर्चात कपात करून नफा वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ मध्ये ते बोलत होते. मंत्री राजेश टोपे म्हणाले की, साखर उत्पादन, अल्कोहोल उत्पादनादरम्यान खर्च वाढत जातो. तो कमी कसा करता येईल या अनुषंगाने व्हीएसआयने कॉस्ट अकाउंटंटच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. कारखान्याचा नफा कसा वाढेल यासाठी खर्च नियंत्रण करायला हवे. कारखान्यांकडून अनेकदा रिटेंशन हार्वेस्टिंग, क्रशिंगबाबत दुर्लक्ष केले जाते. डिफ्यूजर्ससारखे नवे तंत्रज्ञान आपण स्वीकारले पाहिजे. यासाठी खर्चात बचत हाच नफा हे लक्षाच ठेवा.

मंत्री टोपे यांनी सांगितले की, स्टीम, पाणी, ऊर्जा बचत यासाठीचे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. आता कारखान्यांमध्ये मेकॅनिकल हार्वेस्टर चा वापर वाढला आहे. यामध्ये कचऱ्यापासून होणारे नुकसान ५ टक्के गृहीत धरले जाते. मात्र, अनेक कारखान्यांचे हे नुकसान १० टक्क्यांवर जाते. हे नुकसान कसे कमी करता येईल याचा विचार केला पाहिजे. जादा ऊस उत्पादनामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यातील ऊस तोडणीवेळी हार्वेस्टरचा वापर अनिवार्य बनले आहे. त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हार्वेस्टरसाठी अनुदानाची मागणी केली आहे. हार्वेस्टरसाठी सब्सिडी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.

मंत्री टोपे म्हणाले की, साखरेची प्रत (क्वालिटी) चांगली येण्यासाठी उपाययोजना करायला हवी. तर आपल्याला व्यावसायिक वापरकर्त्यांकडून जादा दर मिळू शकतो. कारखान्यांनी आर्टिफिशियल इंटिलिजन्सकडे लक्ष देवून इनोव्हेशन आणि स्कील डेव्हलपमेंट वर भर द्यावा. कारखान्यांनी पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती स्वीकारली पाहिजे. पाण्याचा वापर कमी कसा करता येईल यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here