साखर कारखान्यांनी आता ‘सीबीजी’ उत्पादनावर लक्ष्य केंद्रित करावे : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

पुणे : देशातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती इथेनॉलच्या विक्रीमुळे सुधारण्यास मदत झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले गेले. आता साखर कारखान्यांनी त्यांचे कामकाज स्थिर व आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य बनविण्यासाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पांची उभारणी करायला हवी, अशी अपेक्षा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येथे व्यक्त केली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मांजरी येथील मुख्यालयात झाली. यावेळी सन २०२२-२३ मधील ‘व्हीएसआय’च्या विविध पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष व सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कै. वसंतदादा पाटील ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि २ लाख ५१ हजार रुपये रोख असे त्याचे स्वरूप आहे. तसेच कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास, कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास, कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार हा दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कारखान्यास, कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार हा कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास, कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार हा सोलापूर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख एक लाख रुपये असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे. साखर कारखान्यांचे पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

याशिवाय विभागवार उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन, तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या विविध गटांतील पुरस्कारांचेही वितरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here