हल्दानी : ऊस विकास तथा साखर उद्योग विभागाचे उपायुक्त, सहाय्यक ऊस आयुक्त, सहाय्यक साखर आयुक्त, ऊस विकास परिषद, सहकारी ऊस विकास समित्या आणि व्हायब्रंट आयटी सोल्यूशन यांची आढावा बैठक नुकतीच झाली. यावेळी आयुक्त हंसा दत्त पांडे यांनी सर्व साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना आठवड्याच्या आधारावर ऊस बिले देण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२२-२३ तसेच आधीच्या गळीत हंगामातील थकीत बिले देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जावी. तरच समित्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळू शकेल. २०२२-२३ या हंगामासाठी साखर कारखान्यांच्या गेटवर तसेच ऊस खरेदी केंद्रांची पाहणी करण्यात आली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बैठकीत आयुक्तांनी मुख्यमंत्री हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्याच्या कामाचा आढावा घेतला. वेळेवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी ऊस विकास विभागाच्या उपायुक्त हिमानी पाठक, किच्छा साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक त्रिलोक मर्तोलिया, नादेही साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक विवेक प्रकाश, जनसंपर्क अधिकारी नीलेश कुमार यांच्यासह अनेक जिल्ह्यांतील सहाय्यक ऊस आयुक्त, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक, समित्यांचे सचिव आदी उपस्थित होते.