उसासाठी साखर कारखानदारांचा शेतकऱ्यांवर बक्षिसांचा वर्षाव

पुणे : यंदा पावसाच्या कमतरतेमुळे उसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी कारखानदारांना उसाची टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही साखर कारखान्यांनी ‘लकी ड्रॉ’ योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील विघ्नहर साखर कारखाना, कोल्हापूर जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना हे आघाडीवर आहेत.

 

शेतकऱ्यांना मिळणार बुलेट आणि बरच काही…

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेंतर्गत शेतकरी मेळावा व बुलेट लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम दि.२१ सप्टेबर २०२३ रोजी झाला. तर तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत कारखान्याचे नेते तथा आमदार डॉ. विनय कोरे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘लकी ड्रॉ’ योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना बुलेट मोटारसायकलसह अन्य बक्षिसे दिली जाणार आहेत.

…अशी आहे वारणा कारखान्याची योजना

अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे एकरी उत्पादन घटणार आहे. कारखानदारांमध्ये त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने उत्पादकांसाठी लकी ड्रॉ जाहीर केला. कारखान्याला तीस टनांहून अधिक उसाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ काढा जाईल. यात तीन बुलेट मोटारसायकली देण्यात येतील. इतरही बक्षिसांची घोषणा झाली आहे. यातून कमी ऊस उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या तोट्यात दिलासा मिळेल. आमदार विनय कोरे यांनी ऊस पुरवठादारांना प्रत्येक टनामागे ठरावीक रक्कम देण्याचीही घोषणा केली.

यंदा उसाची टंचाई भासणार आहे. जर कारखाना दीर्घकाळ चालला तर ते फायद्याचे ठरते. त्यामुळे कारखानदार उसासाठी सभासदांना, इतर शेतकऱ्यांना विविध प्रलोभने दाखवू लागले आहेत. ऐन वाढीच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ चांगली झालेली नाही. याचा फटका उसाच्या उताऱ्याला बसेल. कारखान्यांना देखील उसासाठी धावपळ करावी लागेल. यातूनच काही कारखान्यांनी ऊस पुरवठादारांना विविध बक्षिसे, पारितोषिके, लकी ड्रॉ, अशी प्रलोभने दाखविण्यास सुरुवात केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here