शेतकऱ्यांशी ‘एफआरपी’च्या कराराचा कारखाना पाडणार पायंडा

718

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे : चीनी मंडी

यंदाच्या ऊस गाळप हंगामात एकूणच एफआरपीचा प्रश्न खूप गाजला. साखर कारखाने आर्थिक अडचणीत होते. तर, शेतकरी संघटनांनी एक रकमी एफआरपीचा आग्रह धरला होता. पण, साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपीच्या बंधनाला बगल देऊन, थेट सभासद शेतकऱ्यांशी टप्प्या टप्प्याने एफआरपी देण्याचा करारच करून घेतला. त्यामुळे पुढच्या हंगामातही हाच पायंडा पडणार असून, एक रकमी एफआरपीचे ऊस उत्पादकांचे स्वप्न आता स्वप्नच राहणार असल्याचे बोलले जात आहे.

शेतकरी संघटनांनी थकीत एफआरपीसाठी आंदोलन करून एक रकमी एफआरपीसाठी आग्रह धरला. त्याची दखल घेऊन साखर आयुक्तालयाने कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखान्यांनी घाई घाईने एफआरपी जमा करण्यास सुरुवात केली. पण, एफआरपीचा एकच हप्ता बहुतांश कारखान्यांनी दिला. आता हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर दबावाखाली कारखान्यांनी सभासद शेतकऱ्यांशी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचे करार करून घेतले आहेत. शेतकऱ्यांनीही कारखान्यांच्या या करारांवर सह्या केल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात २८ साखर कारखान्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांशी करार केले आहेत.

राज्या या वर्षी १९३ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले. या कारखान्यांत एक मार्चपर्यंत ८३७.७२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, एकूण ९२ लाख ५० हजार लाख टन साखर उत्पादन झाले आहे. साखरेला बाजारात मागणीच नसल्यामुळे कारखान्यांकडे कॅश फ्लो नव्हता. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे थकवले. सध्या राज्यात ४ हजार ८६४ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जवळपास पावणे आठ हजार कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांकडून भागवण्यात आली.

ऊस नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत टप्प्या टप्प्याने एफआरपी देण्याचा करार केला नसेल, तर त्यांना ऊस मिळाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी लागते. अन्यथा या कारखान्यांना एफआरपीचे व्याज द्यावे लागते. त्यामुळे कारखान्यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांशी करार करून घेण्यास सुरुवात केली आहे. काही कारखान्यांनी त्यांच्या वार्षिक सभेतच असे ठराव करून घेतले होते. आता हाच पायंडा पडणार असल्याने पुढील हंगामातही तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची पद्धत रूढ होणार असल्याचे बोलले जाते.

ऊस दिल्यानंतर सभासद शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम, त्यानंतर बेंदूर काळात दुसरा आणि दिवाळीत तिसरा हप्ता देण्याचे करार करण्यात येत आहे. त्यावर शेतकरीही मंजुरी देत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला असा करार केलेल्या कारखान्यांची संख्या १७ होती ती आता २८ झाली आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here