साखर कारखानदारांना जादा दर देण्यास भाग पाडणार : राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : सरकार साखर कारखानदारांना राज्य सरकार पाठीशी घालत आहे. आता या खोकेबाज सरकारकडून अपेक्षा निरर्थक आहेत. त्यामुळे आक्रोश मोर्चाद्वारे आम्ही कारखानदारांकडे ४०० रुपये दुसऱ्या हप्त्याची मागणी लावून धरली आहे. शेतकऱ्यांसमोर सरकारच नाही, तर साखर कारखानदारही झुकतील. त्यांना दर देण्यास भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

करवीर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले की, सरकार कारखानदारांकडून ४९ रुपये लिटर दराने इथेनॉल खरेदी करत आहे. ते पेट्रोलमध्ये मिसळून जनतेला १०६ रुपयांना विकत आहे. यातून सरकारला लिटरमागे ५७ रुपये मिळतात. पण कारखानदार याचा जाब सरकारला न विचारता कारखाने कर्जात असल्याचे सांगतात. एप्रिल महिन्यानंतर कारखानदारांनी चढ्या भावाने साखर विक्री केली. त्यामुळे गेल्यावर्षीच्या पुरवठाधारक शेतकऱ्यांचा फरकाच्या रकमेवर अधिकार आहे. राज्यातील नऊ कारखान्यांनी दुसरा हप्ता दिला आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने उतारा चांगला असताना टाळाटाळ करत आहेत.

यावेळी सरपंच बनाबाई यादव, उपसरपंच नामदेव सुतार, सर्व सदस्य, मुकुंद पाटील, उत्तम पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, प्रा. बाजीराव पाटील, रंगराव पाटील, रामचंद्र पाटील, बळीराम चव्हाण, राजाराम पाटील आदी उपस्थित होते. बाजीराव पाटील यांनी स्वागत केले. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. बळीराम चव्हाण यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here