साखरेच्या दरात वाढ; कारखाने शिल्लक साखर निकालात काढणार

अहमदनगर : चीनीमंडी

पश्चिम महाराष्ट्रातील महापुराची स्थिती आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतून वाढलेली साखरेची मागणी यामुळे साखरेच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक पेचात अडकलेल्या साखर कारखान्यांना किंचित दिलासा मिळताना दिसत आहे. सध्या साखरेच्या दरात प्रति क्विंटल शंभर ते दीडशे रुपये वाढताना दिसत आहे. या वाढलेल्या दराने कारखान्यातील शिल्लक साखर निकाली काढण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील साखर कारखाने करणार आहेत. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ९.५० लाख टन साखर शिल्लक असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत ही साखर हळू हळू बाजारात येणार आहे.

साखरेच्या एकूण उत्पादनाचा विचार केला तर, गेल्या हंगामात जिल्ह्यात साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले होते. परंतु, औद्योगिक क्षेत्रात लागणारी साखरेची मागणी घटली होती. त्याचवेळी साखरेला दरही नव्हता. त्यामुळे कारखान्यांमध्ये साखर पडून होती. साखरेचे दर पडू लागल्यानंतर केंद्राने साखरेचा किमान विक्री दर निश्चित केला होता. पहिल्यांदा २९०० रुपये क्विंटल दर होता. त्यानंतर साखर उद्योगातून दर वाढविण्याची मागणी केल्यानंतर त्यात वाढ करून ३१०० रुपये करण्यात आला. साखरेला अपेक्षित दर नसल्यामुळे चिंतेत असलेल्या साखर कारखानदारांना गेल्या दोन आठवड्यांत दिलासा मिळाला आहे.

सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी हे सण असल्यामुळे बाजारातून साखरेची मागणी वाढली आहे. पुरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर बाजारात येऊ शकली नाही. त्याचा परिणाम साखरेच्या दरांवर झाला आहे. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, मिठाईवाले यांच्याकडून साखरेची मागणी वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर बाहेर पडली नसल्यामुळे नगर जिल्ह्यातील साखरेला मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आपला शिल्लक साठा निकाली काढण्याची ही संधी असल्याचे मानले जात आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे साखर कारखान्यांच्या जीवात जीव आला असला तरी, ग्राहकांच्या खिशावर ताण आला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here