बांगलादेशमध्ये घाऊक बाजारात साखरेच्या दरात तेजी

ढाका : रिफायनर्सनी फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून साखरेची चढ्या दराने विक्री करण्याचे जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच बांगलादेशामध्ये घाऊक बाजारात साखरेचे दर तेजीत आहेत. सरकारने साखरेचा किरकोळ विक्री दर निश्चित केल्यानंतरही हे दर वाढले आहेत. बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशनने २६ जानेवारी रोजी बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोग आणि वाणिज्य मंत्रालयाशी किमतीच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली आणि त्याच दिवशी प्रती किलो ५ टका दरवाढीची घोषणा केली. एक फेब्रुवारीपासून पॅकबंद साखरेसाठी ११२ टका आणि खुल्या साखरेसाठी १०७ टका असा नवा दर लागू होणार आहे. परंतु ढाका आणि चट्टोग्रामसह देशाच्या विविध भागांत खुली साखर ११५ ते १२० टका प्रती किलो दराने आणि पॅकबंद साखर १२० ते १२५ टका किलो दराने विकली जात आहे. बांगलादेशातील बाजारपेठांमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साखर टंचाईचा सामना करत आहे.

घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले की, नवीन दर जाहीर झाल्यानंतर लगेच, साखरेचा घाऊक भाव प्रती मण (३७.३२ किलो) ५० टका वाढून ३,९२० टकावरून ३,९५० टका झाला आहे. किरकोळ व्यापारी आणि आयातदारांचे म्हणणे आहे की कमी पुरवठा, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि जास्त आयात दर यामुळे साखरेची चढ्या भावाने विक्री होत आहे. मात्र, पुरवठ्यातील तूट लवकरच दूर होईल, असे रिफायनर्सचे म्हणणे आहे. किरकोळ विक्रेत्यांनी असा दावा केला की त्यांना डिलरकडून पॅकेबंद साखर ११० टका प्रती किलो दराने विकत घ्यावी लागली, ज्याची किंमत १०७ टका प्रती किलो दर्शविली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here