साखर उत्पादन आणखी घसरण्याचा ‘इस्मा’चा अंदाज

नवी दिल्ली : चीनी मंडी

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) यंदाच्या हंगामात (२०१८-१९) साखर उत्पादन आणखी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी ‘इस्मा’ने साखर उत्पादन ३१५ लाख टन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. आता ३०७ लाख टन उत्पादनाचा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जानेवारीच्या मध्यात सॅटेलाईटच्या साह्याने घेण्यात आलेल्या ऊस क्षेत्राच्या छायाचित्रांवरून हा नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच लाख टन साखर बी ग्रेड मळीपासून इथेनॉल तयार करण्यासाठी वळवण्यात आल्याचे गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत (१५ जानेवारी) देशात ५१० साखर कारखान्यांमध्ये झालेल्या ऊस गाळपातून १४६.८६ लाख टन साख तयार झाली आहे. गेल्या हंगामात याच काळात १३५.५७ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत उत्पादन ८.३२ टक्क्यांनी जास्त दिसत असले तरी, यंदाचे एकूण उत्पादन कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदाचा हंगाम एकवर्षापेक्षाही कमी कालावधीचा असला तरी, यंदा काही कारखान्यांनी गाळप लवकर म्हणजेच वेळेत सुरू केले आहे. त्यामुळ सध्याच्या घडीला उत्पादनात वाढ दिसत आहे.

उत्तर प्रदेशात १५ जानेवारी पर्यंत ११७ साखर कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप सुरू होते. त्यात ३८२.१ लाख टन गाळप झाले आहे. त्यातून ४० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जानेवारी महिन्यात आलेल्या सॅटेलाईट छायाचित्रांवरून उत्तर प्रदेशात यंदा ऊस क्षेत्र घटल्याचे दिसत असले तरी, रिकव्हरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या हंगामात उत्तर प्रदेशात १२०.४५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तर, यंदा तेथे ११२.८६ लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात सध्या १८८ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. त्यातून १५ जानेवारी अखरे ५० लाख ७२ टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी १८३ साखर कारखान्यांमधून याच काळात झालेल्या उत्पादनापेक्षा ७ लाख टन साखर उत्पादन जादा झाले आहे. महाराष्ट्रात यंदा काही कारखान्यांनी १० ते १५ दिवस आधीच गाळप सुरू केल्याने उत्पादन जास्त दिसत आहे. ‘इस्मा’च्या सुधारीत अंदाजानुसार महाराष्ट्रात यंदा ९५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

दरम्यान, कर्नाटकमध्ये ४२ लाख टन उत्पादनाचा अंदाज असून, गेल्या हंगामात ३७ लाख टन उत्पादन झाले होते. त्या राज्यात ६५ कारखान्यांतून आतापर्यंत २६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याच काळात २१ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

देशात तमीळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगण, बिहार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत मिळून ६२ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन अडीच लाख टनाने जास्त आहे.

निर्यात राहणार मर्यादित

यंदा भारताने ५० लाख टन साखर निर्यात कोटा निश्चित केला आहे. पण, साखर कारखान्यांना त्यांच्या कोट्याची निर्यात करण्यास सक्ती केली नाही किंवा त्यांना त्यावर दंड केला नाही तर, भारतातून ३० ते ३५ लाख टन साखरच निर्यात होण्याची अपेक्षा आहे. देशात ३१ डिसेंबर २०१८पर्यंत १९ हजार कोटी रुपयांची ऊस बिल थकबाकी झाली आहे. त्यात २ हजार ८०० कोटी रुपये हे मागील हंगामातील ऊस बिलाचे आहेत.

१५ जानेवारीपर्यंत इतर राज्यांतील उत्पादन (आकडे टनामध्ये)

तमीळनाडू – २ लाख

गुजरात – ५.३० लाख

बिहार – ३.४० लाख

आंध आणि तेलंगण – ३.१० लाख

पंजाब – २ लाख

हरियाणा – २.२० लाख

उत्तराखंड – १.३५ लाख

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड – १.६५

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here