कबिरधाम जिल्ह्यात भातानंतर ऊस पिक सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी ३२ हजार हेक्टरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी ८० टक्के ऊसाची खरेदी पूर्ण केली आहे. कारखाने आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या नजीक आहेत. तर गुळ कारखान्यात उसाची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. खासगी गुळ उत्पादन कंपन्या ऊसाला प्रजातीनुसार २७० ते ३३० रुपये प्रती क्विंटल दर देत आहेत.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मार्चच्या अंतिम आठवड्यापर्यंत दोन्ही सहकारी साखर कारखान्याचे गाळप बंद होऊ शकते. गळीत हंगाम बंद होण्यापूर्वी कारखान्याकडून पंधरा दिवसांत तीन वेळा सूचना दिली जाईल. यंद भोरमदेव सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा ११ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळेल. गूळ कारखान्यात अशा प्रकारे अतिरिक्त दर दिला जात नाही. हरिनछपरा येथील तिरुपती गुळ उद्योगाचे संचालक बद्री प्रसाद वर्मा यांनी सांगितले की, उसाच्या प्रजातीनुसार खरेदी केली जाते. शेतकरी रोहित साहू, गोवर्धन चंद्रवंशी यांनी सांगितले की, ऊस शेतीत फारशी अडचण येत नाही. साखर कारखान्याकडून खरेदीसाठी वेळेवर तोडणी पावती मिळाली तर दिलासा मिळतो. शेतकऱ्यांना आपला ऊस १ नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारी या काळात विकायचा असतो. कारण उन्हाळ्यात पिक वाळू लगते. मात्र, साखर कारखाने बिले देण्यास उशीर करत आहेत. ऊस विक्री केल्यानंतर एक महिन्यानंतर पैसे मिळत आहेत. भोरमदेव साखर कारखान्याने १७ जानेवारीनंतर बिल दिलेले नाही. आजअखेर ३०.८५ कोटी रुपयांची थकबाकी कारखान्याकडे आहे. कारखान्याच्या ऊस विभागाचे अधिकारी के. के. यादव म्हणाले की, शेतकऱ्यांना बिल देण्याची तयारी सुरू आहे. होळीपूर्वी पैसे दिले जातील.