साखर हंगाम २०२०-२१: देशभरात ९८ कारखान्यांचे गाळप बंद

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या गळीत हंगामात एक ऑक्टोबर २०२० पासून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५०२ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. तर देशभरात एकूण ९८ साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आपले गाळप संपुष्टात आणले आहे.

देशभरात एकूण ५०२ साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारीअखेर २३३.७७ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात २९ फेब्रुवारीअखेर देशात ४५३ साखर कारखान्यांनी १९४.८२ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत साखरेचे उत्पादन ८४.८५ लाख टन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत साखरेचे उत्पादन ५०.७० लाख टन झाले होते. सध्याच्या गळीत हंगामात १८८ साखर कारखाने सुरू असून आतापर्यंत १२ साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने गाळप बंद केले आहे. यातील बहूतांश साखर कारखाने सोलापूर विभागातील आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत २५ साखर कारखान्यांचे गाळप समाप्त झाले होते.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या १०९ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. तर ११ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. हे बहूतांश कारखाने पूर्व उत्तर प्रदेशातील आहेत. २८ फेब्रुवारी अखेर राज्यात या कारखान्यांनी ७४.२० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ११९ कारखान्यांनी ७६.८६ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

कर्नाटकमध्ये २८ फेब्रुवारीअखेरपर्यंत ६६ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू होते. त्यांच्याकडून ४०.५३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ६३ साखर कारखान्यांनी ३२.६० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

गुजरातमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ७.४९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. १५ साखर कारखान्यांपैकी एका कारखान्याचे गाळप बंद झाले आहे. गेल्यावर्षी २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ६.८३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तामिळनाडूत २६ कारखान्यांनी ३.१६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत साखरेचे उत्पादन ३.३ लाख टन झाले होते.

उर्वरीत राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओरिसामध्ये सामूहिकपणे २८ फेब्रुवारीपर्यंत २३.५४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here