कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले, आंदोलकांनी उसाचा ट्रॅक्टरला लावली आग

कोल्हापूर : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या ऊस दर आंदोलनाकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदार यांनी फारसे गांभीर्याने न घेतल्याने शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या संयमाचा बंध फुटू लागल्या आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळीत ऊसदर आंदोलनाचा भडका उडाला असून ठिकठिकाणी ऊसतोड, ऊस वाहतूक रोखली जात आहे. सोमवारी शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलथवून टाकण्याचा प्रकार घडल्याने तणावात आणखीनच भर पडली आहे. रविवारी रात्री वारणा साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले.

‘वारणा’चा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात पेटविला…

गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. वारणा कारखान्याची वाहतूक का रोखली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केल्याने रविवारी रात्री या कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. रात्री वारणा सहकारी साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात लोकांनी पेटविला. ही घटना वाठार – पारगाव रस्त्यावरील चावरे फाट्याजवळ घडली आहे.

साखर कारखानदार समर्थकांना धक्काबुक्की…

सोमवारी सकाळी शिरोळ तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये उसाच्या गाड्या रोखण्यात आल्या. चाकातील हवा सोडून देण्यात आली. टाकळीवाडीत काही शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देण्यात आम्हाला रोखू नका, असे म्हटले होते. त्याला शेतकरी संघटनांनी आव्हान दिले. टाकळीवाडी येथे साखर कारखान्याजवळ असलेल्या उसाच्या फडात जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलक अंकुश यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. यावेळी साखर कारखानदार समर्थकांना धक्काबुक्की करण्यात आली.

उसाच्या गाड्या उलथवून टाकल्या…

संतप्त आंदोलकांनी उसाच्या गाड्या उलथवून टाकल्या. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साखर कारखाने तसेच परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुरुदत्त शुगर कारखाना परिसरात राडा…

ऊसदर आणि मागील हंगामातील ज्यादा साखर दरातील 400 रुपये मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवून दिल्याच्या घटना घडत आहेत. शिरोळ तालुक्यात गुरुदत्त शुगर कारखाना परिसरात राडा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका : माजी खासदार राजू शेट्टी

शेतकऱ्यांनी संयम सोडला तर यांना पळता\भुई थोडी होईल, असा इशारा राजू शेट्टी यांचा साखर कारखानदारांना इशारा दिला आहे. शेट्टी यांच्या भूमिकेमुळे पुढील काळात आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. ज्यांनी आमचे पैसे लुटले, त्यांना तुम्ही संरक्षण देता आणि शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करता. असा जाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला जाईल. हा संघर्ष लवकर मिटला नाही, तर आणखी तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला.

पोलिस बघत बसतील का? : मंत्री मुश्रीफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोल्हापूर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालून जाब विचारतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. जर गृहमंत्र्यांना घेराव घातला तर पोलिस बघायची भूमिका घेतील का? असा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here