पानीपत : हरियाणातील काही साखर कारखाने ऊस टंचाईचा सामना करीत आहेत. याचा थेट परिणाम गाळपावर झाला आहे. उसाची आवक कमी झाल्याने पानीपतमधील नवीन सहकारी साखर कारखाना निम्म्या क्षमतेने गाळप करीत आहे. कारखान्याच्या ५०,००० क्विंटल प्रती दिन गाळप क्षमता असताना केवळ २५,०००-३०,००० क्विंटल ऊस गाळपास येत आहे. आता कारखान्याचे अधिकारी तोडणी पावतीविना ऊस गाळप करण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला ऊस घेऊन येणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी येथील दहर गावात राज्यातील सर्वात मोठ्या ‘पानीपत सहकारी साखर कारखान्या’चे उद्घाटन केले होते.
.प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, २८ मार्च रोजी जुना साखर कारखाना बंद करण्यात आला. जुन्या साखर कारखान्यात जवळपास २८ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. नव्या साखर कारखान्यात आतापर्यंत १४ लाख क्विंटल ऊस गाळप केला आहे. नवा साखर कारखाना सुरू करण्यास उशीर झाल्याने शेतकऱ्यांनी आपले पिक कर्नाल आणि उत्तर प्रदेशातील आसपासच्या जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्याकडे पाठवून दिला आहे.
ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नवा साखर कारखाना निम्म्या क्षमतेने गाळप करीत आहे. त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान होत आहे. २८ मेगावॅट क्षमता असूनही टर्बाईन केवळ ६ मेगावॅटवर सुरू आहेत. साखर उताराही घटला आहे. जर टर्बाइन पूर्ण क्षमतेने चालविले नाही, तर वीज पुरवठा होणार नाही. पानीपत सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, नुकसान टाळण्यासाठी आम्ही १५ मेपर्यंत हंगाम समाप्ती करण्याच्या विचारात आहोत. शेतांमध्ये केवळ ३.५ लाख क्विंटल ऊस शिल्लक आहे. मात्र कारखाना संथ गतीने सुरू आहे. ते म्हणाले की, कारखान्याला प्रती दिन ४०,००० ते ५०,००० क्विंटल ऊसाची गरजआहे. मात्र, केवळ २५,००० ते ३०,००० क्विंटल ऊस मिळत आहे. आम्ही शेतकऱ्यांना ७५,००० क्विंटल उसाची तोडणी पावती वितरीत केली. तोडणी पावतीविना आवक सुरू केली आहे. त्यातून कोणताही शेतकरी ऊस घेऊन येऊ शकेल.