देशात ऊस लागवड क्षेत्रात चार लाख हेक्टरने वाढ

नवी दिल्ली : कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात यंदा ५९ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. ऊस क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा चार लाख हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ३१ ऑगस्ट २०२२ अखेर ५५ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. देशात जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाल्याने ऊस लागवडीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जूनपर्यंत पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी ऊस लागवड संथ गतीने झाली. जुलैच्या उतरार्धात ऊस लागवडीला गती मिळाली. देशात उत्तर प्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक ही राज्‍ये ऊस लागवडीमध्ये आघाडीवर असून एकूण ऊस लागवडीपैकी सुमारे ७० टक्के ऊस क्षेत्र या राज्यांचे आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्‍यावर्षी २८ लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. तर महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र १२ लाख हेक्‍टरवर होते. उत्तर प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने सध्‍या ऊस लागवड गतीने झाली. तर महाराष्‍ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे लागवडी धीम्या गतीने सुरू आहेत. कर्नाटकातही अशीच स्थिती आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस झाला तर पुढील दोन महिन्यांत ऊस लागवड गतीने होईल असे अनुमान आहे.

कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, देशात १,०७७ लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी ३१ ऑगस्टअखेर १,०७३ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्‍या होत्या. यंदा ३९८ लाख हेक्‍टरवर भात पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या १२५ लाख टन तर कापसाच्या १२२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. भरडधान्‍य १८१ लाख हेक्टर, तेलबियांच्या १९० लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यंदा पावसाअभावी उत्पादनात घट होईल. लागवड क्षेत्र वाढूनही ऊस उत्पादनात घट येत असल्याचे चित्र दिसू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here