सांगली जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता

सांगली : यंदा पावसाने दडी मारल्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ६२,८६० हेक्टरवर ऊस लागवड झाली असून यापैकी ३६,९४२ हेक्टरवर आडसाली उसाचे क्षेत्र आहे. दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाईच्या स्थितीमुळे उसाचे क्षेत्र आणखी कमी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे आडसाली हंगामात ऊस लागवड कमी झाली आहे. तर पाणी टंचाई फटका पूर्व आणि सुरू हंगामातील ऊस लागवडीला बसला आहे.

ताकारी, म्हैसाळ, आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांचे आवर्तनामुळे शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. मात्र, यंदा दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसाने दडी मारली आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि जत तालुक्याला या योजनांचे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. भूजल पातळी घटू लागली आहे. त्यातच कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने घट होत आहे. कृष्णा आणि वारणा काठासह पूर्व भागात लागवड कमी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here